माझा पहिलावहिला (??) ट्रेक.(१९८८). पन्हाळा गड परिक्रमा
माझा पहिलावहिला ट्रेक. (१९८८). पन्हाळा परिक्रमा भ्रमण.
रामदास त्याच्या ट्रेकिंग चं वर्णन ब्लॉग मार्फत लिहितोय.
थोडं मलाही वाटलं की आपणही जी काही छोटी छोटी ट्रेक केलेत त्याबद्दल लिहावं. पण कसं? अशावेळी नेमकं सुचत नाही.
मी मात्र त्याला सल्ले देतोय आणि मलाच लिहिताना कळतंय की नेमके शब्द कुठेतरी दडी मारून बसतात. मनाचा थोडा हिय्या करून लिहायला बसलं की मग शब्द हळूहळू सुचायला लागतात. आताही तसंच होतंय. म्हटलं, आपणही आपल्या पहिल्या ट्रेकपासून लिहायला सुरवात करू.
मी अकरावीत असेन. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर १९८८. कॉलेजला दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या. हापचड्डीतून फुल पॅंटेत गेलेलो. शाळेचं दप्तर सोडून आता प्लास्टिकच्या पिशवीतून वह्या न्यायचो. एवढाच काय तो बदल झालेला.
सुट्टीत मोकळाच वेळ असल्याने नेहमीचे उद्योग (खटाटोपी पणा आणि घरच्यांना त्रास) चालू होते. तेंव्हा कॉलनीतील सभासदकाकांनी पन्हाळा परिक्रमा भ्रमण, याबद्दल माहिती दिली. आज आपण याला ट्रेकिंग म्हणतो. ते स्वतः, त्यांचा मुलगा अभिजित आणि छोटी मुलगी अस्मिता, हे तिघेही जाणार होते. मग मी आणि संदीप (शिंदे. माझा अगदी जवळचा मित्र आणि आम्ही एकत्रित अभ्यास करून दहावी पास होऊन एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तेही एकाच वर्गात बसत असू) आम्ही दोघेही तयार झालो. वडिलांना सभासदकाकांनी पूर्ण कल्पना दिली आणि संमती देखील मिळवली. नक्की आठवत नाही पण फी म्हणून बहुतेक ₹२० की ₹५०/- भरले होते. त्यात एसटीचा प्रवास. सकाळचा नाष्टा, दुपारी जेवण आणि माहिती. अट म्हणजे लहान मुलं फक्त पालक असतील तरच येऊ शकतील आणि वयस्कर लोकांनी स्वतः सोबत कुणी जवळचं असणारे घेऊन येणं आवश्यक. एक पाण्याची बाटली, थोडं वरचं खाणं, टोपी, शक्य असल्यास बूट. इतकंच. अंगात अमुक प्रकारचे टी शर्ट किंवा खास ट्रेकिंग चे शूज असली काही भानगड नव्हती.
मी कोल्हापूरकर. फॅशनबिशन माहिती नव्हतीच. जे नवीन घालू ती फॅशन. ट्रेकिंगचा माझा अवतार असा होता. हाफ बाहीचा शर्ट तोही नायलॉनचा. कॉटनचे शर्ट म्हणजे एकतर फार महाग मिळायचे किंवा रंग जायचा म्हणून खूप कमी लोकं वापरत. खाली फुल पॅन्ट. बाटा कंपनीचे स्लीपर, जे मी कॉलेजला जातांना घालत असे. माझ्या पायात कधी बूट टिकले नाहीत. एकतर घासून टाचा लगेच जायच्या. कारण प्लास्टिकचे बूट असायचे किंवा मला सवय नसल्याने मी विसरायचो. म्हणून बाटा चे स्लीपर नेहमी पायात. तेच आता ट्रेक साठी. पप्पांची टोपी. एक पाण्याची बाटली. आणि आईने सकाळी उठून केलेल्या चपात्या आणि भजी (हा माझा आवडता प्रकार). हे एका झोळी सारख्या पिशवीत. आणि ती पिशवी घरी येईपर्यंत गळ्यात. कारण कुठे विसरू नये म्हणून.
आम्ही पाचजण एसटी स्टँडवर सकाळी पहिल्या बसने पोचलो. साधारण पन्नासएक लोकं ट्रेकला आलेले होते. अगदी साठी पार केलेले एक जोडपं सुद्धा आणि त्यांच्या घरातील सर्व मंडळी. लहान मुलामुलींची संख्या भरपूर होती. त्यातील बऱ्याच लोकांनी अशी खूप ट्रेकिंग केलेली होती. त्या साठी पार केलेल्या जोडप्याचं आणि अस्मिता आणि अजून एक खूप लहान मुलं म्हणून सर्व ग्रुपमध्ये अप्रूप होतं. सगळे त्यांना कौतुकाने बघत होते.
ठरवलेली गाडी आली आणि आम्ही लगेच निघालो. बहुतेक आम्हाला निघायला थोडा उशिर झाला असेल. कारण फार वेळ न घालवता जे आयोजक होते त्यांनी आमची एकदा हजेरी घेतली आणि लगेच निघालो. जे कुणी राहिलं असेल ते असो.
मी, संदीप आणि अभिजित गप्पा मारत होतो तर तिकडे तो सगळा ग्रुप गाणी म्हणत प्रवासातील वेळ घालवत होते. मी आणि संदीप ग्रुपमध्ये नवीनच होतो त्यामुळे कुणाशी ओळख नव्हतीच. पण हळूहळू आम्ही पण त्यांच्यापैकी एक होऊन गेलो. गाडीत खाणं पिणं झालं.
पन्हाळ्यावर उतरल्यावर लगेच आम्हाला ट्रेकची पूर्ण माहिती दिली. आणि अजिबात वेळ न घालवता दोघा दोघांचे ग्रुप करून एका मागोमाग एक असे ग्रुप चालू लागले. थंडी होती की नव्हती हे आता आठवत नाही.
आठवण खूपच पुसट झालीय. इतकंच आठवतंय की आम्ही जंगलातून जात होतो. ठिकठिकाणी झाडाला कापडाचे तुकडे बांधून ठेवलेले आणि दगडांवर काही नावं तसेच बाण दाखवलेले होते. त्या प्रमाणे आम्हाला नेण्यात येत होतं. सुरवातीला आम्हाला उतारावरून नेलं नंतर मात्र कितीवेळा वर खाली गेलो हे मात्र आठवत नाही. पण कुठेही न थांबता सगळे चालत होते. गप्पा मारणं आणि चालत राहणं. उद्देश फक्त जंगलातून पायपीट. मातीची पायवाट, आणि काही ठिकाणी तर झाडीच झाडी. पाय ठेवेल तिथे झाडांचा वाळलेला पालापाचोळा. आमच्या म्होरक्यांना ही पायवाट कशी सापडत होती कोण जाणे.
जाता जाताच आमच्या हातात सँडविचचे पॅकिंग हातात दिले आणि हाच तो नाष्टा असं सांगितलं. थांबायचं नव्हतंच. चालत चालतच खायचं. त्यात ते अळणी. अजिबात मीठ नव्हतं. तरी मी काकांना विचारलं तर ते म्हणाले की मीठ असेल तर जास्त तहान लागते आणि जास्त पाणी पिलं तर चालणं मुश्किल होतं. ते अळणी सँडविच कसंबसं संपवून एक दोन घोट पाणी पिलं. तरी काका म्हणालेच की जास्त पाणी पिऊ नका. पाणी संपवू नका कारण जंगलात पाणी मिळणार नाही. मग काय, पाण्याची बाटली बॅगेत ठेवली तशी सारखी तहान लागायला लागली. कदाचित सँडविच चा परिणाम असेलही.
लहान मुलं मस्त हुंदडत चालत होती. तर वयस्कर लोकं एकमेकांना सांभाळून घेत. तेंव्हा मोबाईल सारख्या भानगडी नव्हत्या. नाहीतर गप्पांऐवजी मोबाईलवरील गाणी ऐकायला मिळाली असती. बाकी पक्षांचे ज्ञान मला अजिबात नव्हते त्यामुळे पक्षांच्या आवाजाकडे लक्ष नक्की नव्हतं.
आणि हो, आम्हाला थोडक्यात सांगितलं होतं की या परिसरात बिबट्या असतात त्यामुळे चहुबाजूला लक्ष राहू देत. त्यामुळे गप्पांचे आवाज फार मोठे नव्हते. पण हे लहान मुलांना कसं सांगणार? त्यांचा आवाज तर त्याच पटीत असतो जेंव्हा ते उत्साहात असतात. दुपारी कधीतरी आम्हाला एका मोकळ्या मैदानात आल्यावर थांबवलं आणि जेवण म्हणून हातात पुन्हा एक बंदिस्त थाळी ठेवली. त्यात भाकरी आणि सुकं पिठलं होतं. तेही पूर्ण अळणी. विशेष म्हणजे आम्हाला जे काही पार्सल दिलं जात होतं ते तेथील गावातील लोकांकडून बनवून घेऊन दिलं जात होतं. संयोजक टीम मधील एक दोन लोकं आणि गावातील दोन तीन लोकं हे खाणं घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोचलेले असत. मला आधी वाटलं की आधीच तयार करून आमच्या सोबतच कुणीतरी घेऊन येतायत की काय? किंवा असंच जंगलात सगळ्यांनी मिळून जेवण बनवून जेवावं लागणार की काय? ही केलेल्या सोयींबद्दल नंतर कळालं.
ते पिठलं अळणी असल्याने कमीच खाल्लं गेलं. अगदी दुसरी भाकरी सुद्धा घेऊ शकलो नाही. पण घरातून आणलेल्या डब्याला हात लावता येणार नव्हता. कारण नियम. मीठ घातलेलं अन्न ट्रेक होईपर्यंत खायचं नाही. जे एकदा घेतलं ते कसंबसं संपवून घोटभर पाणी पोटात ढकलून थोडावेळ आम्ही विश्रांती घेतली. या दरम्यान काही समवयस्क मित्रांची ओळख झाली. काही मुंबईतून आणि काही पुण्यातून आलेले होते. मला हे मात्र भारी वाटलं. कारण, पुणे किंवा मुंबईची परिस्थिती माहितीच नव्हती. आता कळतंय की अजूनही पुण्यामुंबईतील लोकांना कोकण किंवा जंगल भागाची एवढी आपुलकी कशी काय ते!
पुन्हा पायपीट चालू झाली. आता शेवटच्या टप्प्यात होतो. कसं ते माहीत नाही. जंगलातून कुठून कुठे गेलो ते कळतंच नव्हतं. सूर्याच्या कलेने दिशा कोणती हे कळण्याइतपत अभ्यासही नव्हता. असं म्हणा ना की किमान मी तरी मेंढरासारखं जात होतो. पण जंगलातून पायपीटीचा हा पहिलावहिला अनुभव भारी वाटला. शेवटीशेवटी सगळेच दमलेले होते. एकतर पाणी संपत आलं होतं. त्यात अळणी खाणं त्यामुळे पोटात भूक अजूनही होती. पाय दुखायला लागले होते. कसंबसं शेवटचा टप्पा पार पाडला. आणि ज्या ठिकाणी बस येणार होती तिथे येऊन थांबलो. थांबलो कसलं! रस्त्यावर बसकण मारली आणि पाय चेपत बसलो.
जो अगदी लहान मुलगा होता तो तर आईच्या खांद्यावर झोपून गेला होता. कधी आईच्या खांद्यावर तर कधी बाबांच्या खांद्यावर झोपेत त्याची परिक्रमा पूर्ण झाली. त्याच्या आईबाबांचं काय झालं असेल कोण जाणे.
तसेच ते सर्वात वयस्कर जोडपं जसं आलं तसं सगळ्यांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. कारण ते दोघे नेहमी अशा ट्रेक्स ना जातात आणि लोकांचा उत्साह वाढवतात. ते दोघेही खूप थकलेले होते. त्या वयातही खूप उत्साहाने त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली होती.
बस आली. आम्ही पुन्हा आपापल्या सीट वर जाऊन बसलो. आणि पुढचा प्रवास कसा झाला तेच आठवत नाही. कदाचित आम्ही झोपून गेलो असुत.
हा अनुभव माझ्यासाठी थोडा वेगळा होता. जंगलात भटकणे हे माझ्यासाठी नवीन नव्हतं. पण एखाद्या गडाची परिक्रमा करणे हे मात्र नवीन होतं. त्यात मी शाळेच्या सुट्टीत मावशीच्या गावी गेलो की तिकडे मावसभावंडांबरोबर अशी भटकंती व्हायची. कधी करवंद तर कधी जाम्भूळ तर कधी कैऱ्या काढायला असं गावाच्या बाहेरील जंगल भागात जात असे. पण भटकंती म्हटली तर आम्ही एक दिवसीय सायकल ट्रिप करायचो. तिकडे जाताना जेवण बनवण्याचं सगळं साहित्य घेऊन जायचं आणि जंगलात दगडाच्या चुलीवर जेवण करून खायचं. पण भात आणि भाकरी मात्र घरातूनच नेलेली असायची. वर्षातून एकदा तरी अशी ट्रिप व्हायचीच.
असो. या ट्रेक मुळे पुढील भटकंतीचा पाया मात्र रचला गेला. यानंतर केलेली रायगडाची परिक्रमा मात्र खूपच चांगली लक्षात राहिली. कारणही त्या ब्लॉग मध्ये कळेलच.
सुंदर !!
ReplyDelete