असा ट्रेक पुन्हा झालाच नाही... रायगड परिक्रमा (१९९०) - भाग १


१२वी ची नुकतीच परीक्षा झाली होती. अगदी आठवडाही झाला नसेल. पण सतत अभ्यास आणि सलग पेपर्स देण्यात फेब्रुवारी आणि मार्च चा अर्धा महिना कसा गेला ते कळालंच नाही. पेपर्स असेतसेच गेलेले. रिझल्ट मिळाल्यावरच पुढील शिक्षणाची दिशा नक्की होणार होती. पण परीक्षा झाल्यावर ते रिझल्ट मिळेपर्यंत काय? हा प्रश्न माझ्यासहित घराच्या सगळ्यांनाच! दरवर्षी परीक्षा झाल्यावर मी आणि संदीप (शिंदे) एक तरी इंग्लिश तोही ऍक्शन असलेला सिनेमा हमखास बघायला जायचो. तो ही बघून झाला होता. मग काही खटाटोप चालूच होते. 
तेंव्हा अभिजित (सभासद) घरी येऊन आम्हाला रायगड परिक्रमा बद्दल माहिती देऊन गेला. ट्रेकिंगची आम्हाला चटक लागलीच होती. यावेळी हा ट्रेक मात्र दोन दिवसांचा होता. त्याची फी साधारण ₹१००/- च्या आसपास काहीतरी होती. वडिलांनी पैसेही दिले. यावेळी सुद्धा  काहीही आढेवेढे घेतले नाहीत. सभासदकाका सोबत असणार होते म्हणून होकार दिला. पण हा ट्रेक मात्र शाळेच्या परीक्षा संपल्यावर होता म्हणजे एप्रिलमध्ये. साधारण तिसऱ्या आठवड्यात. तेंव्हा एक चांगलं होतं राव! परीक्षा अगदी आठदहा दिवसांत संपायची. उगाच ताणून वेळ काढुपणा तेंव्हाच्या शाळा करत नसत. मुळात CBSE हा प्रकार असेल तर आम्हाला माहीतही नव्हता. इंग्लिश मीडियम स्कुल म्हणजे श्रीमंत लोकांच्या पोरांची शाळा. एवढंच आम्हाला माहिती. तेंव्हाच्या सगळ्याच शाळा सारख्याच. गुणवत्तेवर आधारलेल्या. उगाच मस्त दिसते म्हणून लोकं पोरांना एखाद्या शाळेत पाठवत नसत. आणि अमूकअमुक शाळेत आमचा पोरगा किंवा पोरगी शिकते असा पोकळ स्टेटस सुद्धा पालक मिरवत नसत. मुलांना किती मार्क पडले हा मात्र स्टेटसचा प्रकार होता. 
पैसे भरून आम्ही आमच्या सीट बुक केल्या. त्या सभासदकाकांनीच केलेल्या. अजून कॉलनीतील मित्र कुणी येणार का हेही पाहिलं पण आम्ही पाचच जण जाणार होतो. मी, संदीप, अभिजित, अस्मिता आणि सभासदकाका. 
आणि जाण्याचा दिवस उजाडला. सकाळी लवकर निघालो असुत कारण कोल्हापूर ते रायगडचा प्रवास करायचा होता. प्रवासात काही खाता यावं म्हणून काही पदार्थ, दुपारचं जेवण, एक टॉवेल, टूथ ब्रश, थोडी टूथ पावडर पुडीत बांधून घेतलेली, लहान साबण आणि झोपताना अंगावर ओढायला एक चादर. इतकंच साहित्य सोबत होतं. आणि तीच मागाच्यावेळाची पप्पांची टोपी आणि तीच झोळी टाइप शबनम बॅग. 
एस टी चा प्रवास मात्र आता आठवत नाही. बहुतेक गाडीतच खाणंपिणं झालं असेल. एखादया ठिकाणी थांबून चहा घेतला असेल. 
आम्ही कोल्हापुरातून साधारण पन्नासेक लोकं आणि मुलं होतो. त्यामुळे संपूर्ण एसटी भरून गेलेली. संध्याकाळी आम्ही सहाच्या सुमारास रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोचलो. आमची राहायची व्यवस्था त्या गावातील शाळेत केलेली. रात्री आठ वाजता जेवण मिळणार होतं. जेवण म्हणजे आमटी भात आणि एक भाजी. बऱ्याच लोकांनी शिदोरी आणलीच होती ती सर्वांमध्ये वाटून घ्यायची ठरलं. जेवणं झाली. 
आणि नंतर आम्हाला कळालं की आम्ही फक्त कोल्हापूरचा ग्रुप आलेला नसून पुणे, मुंबई आणि अजून दोन तीन शहरातील ग्रुप्स आलेले आहेत. आणि सगळेजण बाहेर मस्त हुंदडत आहेत. आमचा कोल्हापूरचाही ग्रुप आता एकमेकांशी मिसळून गेलेला आणि आम्ही ग्राउंडवर काही खेळ खेळत बसलो होतो. 
ज्या शाळेत आम्ही उतरलो होतो ती मोठी होती. दगडी भिंती आणि कौलारू छप्पर असलेली. प्रत्येक खोलीला दोन दोन छोट्या खिडक्या आणि एकच दार. एक मिणमिणता बल्ब. अंथरण्यासाठी जाजम (मोठी सोलापुरी जाड सतरंजी). इतकंच. 
जेवणं झाल्यानंतर मला वाटलं की लवकर झोपून लवकर उठून आवरावं लागेल. पण ग्रुप मध्ये वेगळीच हालचाल चालू झालेली. बाहेर अंधारात ग्रुपमधील काही लोकांचं पुढील प्लॅनिंग झालं. आणि ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली, की आज पौर्णिमा असल्याने रात्री रायगडावर जाऊन यायचं! जे कुणी येणार असतील त्यांनी बाहेर ग्राउंडवर ताबडतोब जमावे. मग काय जवळपास सगळ्याच ग्रुपमधील तरुण मंडळी ग्राउंडवर आली. मी आधी जायला तयार नव्हतो. अंधार किंवा चालणं हे कारण नव्हतंच तर कारण होतं बिबट्या. त्याबद्दल आधीच सर्वांना सूचना देण्यात आलेली होती. पण सभासदकाकांनी समजावलं की इतकी लोकं असतील तर कोणताही वन्यजीव आपल्या जवळ येणारही नाही. मग मीही तयार झालो. 
लगेच दोन दोन चे ग्रुप केले आणि आम्ही रायगड चढू लागलो. चंद्रोदय व्हायला अवकाश होता. त्यामुळे अंधारात चाचपडत चालणं तसेच पुढील जसा जातोय त्याच्या मागोमाग जाणं. आजूबाजूला काय आहे हे माहितीही नव्हतं. चालणं चालूच होतं. काही लोकांच्या हातात बॅटरी होत्या (म्हणजे टॉर्च). म्हणजे आधीच प्लॅनिंग केलेलं होतं. साधारण 10च्या सुमारास चंद्र उगवल्यावर थोडं थोडं दिसायला लागलं तेंव्हा आम्ही कड्यावरून जातोय हे जाणवलं. आम्हाला सूचना मिळाली की पुढे पायवाट अरुंद आहे त्यामुळे एकापाठोपाठ एक असं चालावं. थंड हवेमुळे गड चढताना थोडी कमी दमछाक होत होती. चंद्राच्या मंद प्रकाशात जाणवलं की आमच्या डावीकडे दरी आहे आणि उजवीकडे उंच कडा. आम्हाला त्या चंद्राच्या प्रकाशात त्या दरीचा थरार जाणवला. एका ठिकाणी तर अगदीच निमुळता कड्याचा काठ होता आणि त्यावरून हळूहळू एका बाजूने दरीकडे तोंड करून सरकत सरकत चाललो होतो. तो भाग भले पाच दहा पावलांचा असेलही पण सर्वांनाच घाम फोडणारा होता. जे दोन तीन जाणकार होते ते आम्हाला हात देऊन तो भाग पार करायला मदत करत होते. मंद प्रकाश होता म्हणून कदाचित मी तो पार केला असेल. दिवसा कदाचित माझं धाडस झालं नसतं. 
तो टप्पा पार करून आम्ही काहीवेळाने राजगडावर पोचलो. साधारण रात्रीचे ११ - ११.३० झाले असतील. सगळेच खूप थकलेले होते. आधी तेथील मंदिराजवळ जाऊन थोडावेळ बसलो आणि थोडी विश्रांती घेतली. असा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला होता. असा विचारही कधी केला नव्हता की रायगडावर पौर्णिमीच्या रात्री चढाई करू म्हणून. आज तो क्षण आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. 
नंतर फार उशीर होऊ नये म्हणून आम्ही आधी बाजारपेठ पटकन बघितली आणि महाराजांचं त्या पौर्णिमेच्या अंधुक प्रकाशात दर्शन घेऊन परतीचा मार्ग धरला. आता त्याच वाटेने उतरायचं होतं. चंद्र बऱ्यापैकी वर आलेला त्यामुळे उतरताना फार त्रास झाला नाही. पण तरीही सगळे काळजी घेत खाली उतरत होते. 
आम्ही शाळेत परत पोचलो त्यावेळी रात्रीचे २.३०-२.४५ वाजले होते. थोडं पायावर आणि तोंडावर पाणी मारून आम्ही लगेच झोपी गेलो...

क्रमशः.....

Comments

Post a Comment