असा ट्रेक पुन्हा झालाच नाही... रायगड परिक्रमा (१९९०) - भाग २

… … पुन्हा पुढे चालू … …
रात्री झोपही पटकन लागली. खरंतर डास खूप त्रास देत होते पण शरीर प्रचंड थकलेलं होतं. त्यामुळे जेंव्हा पहाटे आम्हाला उठवलं तेंव्हा वाटलं की अरे आत्ताच तर झोपलो होतो. लगेच कशाला उठवलं? तेंव्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही सर्वात शेवटी उठलाय आणि बाकीचे आधीच उठून तयार झालेत. झालं. पटकन उठलो आणि झटपट प्रातःविधी उरकून घेतला. अंघोळीचा प्रश्नच नव्हता कारण पाण्याची फारशी सोय नव्हतीच. जे काही थोडं पाणी मिळालं त्यात हातपाय आणि तोंड धुवून , कपडे चढवून तयार झालो. आम्ही परत इथेच येणार होतो म्हणून बॅगेत फक्त पाण्याची बाटली तेवढी घेतली. बाकीचे खाद्यपदार्थ घेण्यास मनाई होती. कारण तेच. मीठ घातलेले पदार्थ ट्रेक मध्ये खायचेच नाहीत. खोलीतून बाहेर पडलो आणि ग्राऊंडवर हजर झालो. चहाचं आधण आणि प्रत्येकी दोन दोन पार्ले जी ची बिस्किटे दिली. तेवढ्याने काहीच होणार नव्हतं. पण चहा मिळाल्याचं थोडं समाधान होतंच. सभासदकाकांनी आम्हाला त्यांच्याकडील अजून थोडी बिस्किटे दिली. त्यामुळे थोडं बरं वाटलं.
एक दोन बॅच पुढे गेल्या होत्या. शेवटी आमची बॅच म्हणजे जे रात्री रायगडावर जाऊन आलेल्यांची बॅच. आम्हाला सूचना देऊन दोघांदोघांचे ग्रुप केले व ट्रेकची सुरुवात झाली.
सकाळचे मस्त वातावरण. सूर्य अजून उगवलेला नव्हता. थोडा माळरानाचा भाग ओलांडून आम्ही दरीकडे निघालो. आमच्या उजवीकडे रायगड होता. आता दिवसा-उजेडी कळत होतं की रात्री कसं कसं चालत गेलो होतो ते. त्यावेळी सभासदकाकांनी रायगडावर जाणारे काही गावकरी मंडळी दाखवली. अगदीच लांबवर असल्याने ती लोकं त्या डोंगरकडावर शोधावी लागत होती. त्यावरून कळालं रायगडाची उंची साधारण काय असू शकते ते आणि आम्ही काल काय पराक्रम केला होता तो! बापरे! आता मात्र जरा घाबरल्यासारखं झालं. रात्री खरंच काहीच कळालं नव्हतं.
आम्ही जंगलातून चाललेलो. घनदाट जंगल असल्याने दिशा अजिबात कळत नव्हत्या. फक्त समोरच्याच्या मागोमाग जाणे आणि चालत राहणे.
मागील ट्रेक मध्ये जसे काही कापडाचे तुकडे लटकवलेले होते तसेच इथेही झाडांना कापडाचे तुकडे लटकवून ठेवले होते. त्यामुळे मार्ग कळत होता. काही ठिकाणी जिथे पायवाटेला फाटे फुटत तिथे मात्र गोंधळ होऊ नये म्हणून एखादा दुसरा मोठा दगड ठेवून त्यावर बाण दाखवलेले होते. चालताना आमच्या गप्पा चालूच होत्या. आमच्या या ग्रुपमध्ये पक्षी निरीक्षण करणारे एक काका होते. ते आम्हाला वेगवेगळे पक्षी दाखवत नेत होते. पण इतकी नावं लक्षात ठेवणं म्हणजे कठीण काम. काहीवेळा ते फक्त आवाजावरून कोणता पक्षी आहे तेही सांगत होते. आम्ही आपलं माना डोलावूनच दाद देत होतो. कारण, पुन्हा तेच. चिमणी, कावळा, बदक , बगळा अशी काही ढोबळ नावं सोडली तर पक्षी निरीक्षण म्हणजे काय आणि ते कशाशी खातात हे कधीच माहिती नव्हतं आणि तसं आम्हाला शिक्षणही मिळालं नव्हतंच. आता जेंव्हा फोटोग्राफी करायला लागलो तेंव्हा कळतंय त्यातील विविधता.
असो, जंगलातून जाताना एका ठिकाणी आम्हाला थांबवलं आणि सँडविच आणि इडली-चटणीची पाकिटे हातात दिली. सँडविच आणि इडली-चटणी अळणीच होतं. कसंबसं संपवलं कारण आता मात्र भूक लागलेली होती. आतापर्यंत किती चाललो हे कळतच नव्हतं. सभोवती फक्त जंगल आणि खूप झाडाझुडुप. पुढे चालणाऱ्या ग्रुपचा आवाज तेवढा यायचा. बाकी तो ग्रुप कोणत्या बाजूला आहे ते मात्र कळत नव्हतं. कुणी थकलं तर ते दोन चार मिनिटे थांबत आणि मागील ग्रुप आला की त्यांच्या सोबत चालू लागत. चढण अशी फारशी नव्हती. चढ उतार होते पण दमछाक व्हावं अशी वाट नव्हती. अधून मधून आमच्या उजवीकडे रायगड दिसायचा. त्याच्या कडा पाहताना भारावून जायला व्हायचं.
सूर्य कधी डोक्यावर आला ते कळालंच नाही. आम्हाला एका ठिकाणी थांबवलं आणि सूचना देण्यात आल्या की आता थोडा भाग अवघड आहे. झाडांना दोर बांधून ठेवलेला आहे आणि तो पकडून खाली उतरायचं आहे. वाटेवर असलेली माती ही रवाळ आहे आणि त्यावरून पाय घसरू शकतो. ज्यांनी चप्पल घातलेलं आहे त्यांनी चप्पल हातात घ्यावं आणि उतारावरून उतरावं. ज्यांना उभं राहून चालता येणार नाही त्यांनी हा टप्पा बसून पार करावा. जिथे दोर संपेल तिथून शक्यतो हळूहळू उतार पार करावा. मला जरा भारी वाटलं. काहीतरी वेगळं. मी चप्पल हातात घेऊन उतरू लागलो तेंव्हा ट्रेकचा पहिला धडा सभासदकाकांनी दिला. म्हणाले की उतरताना नेहमी तिरकस बाजूने उतरायचं. म्हणजे डाव्या किंवा उजव्या पायावर खाली एक पाऊल उतरून तो जोपर्यंत जमिनीवर घट्ट होत नाही तोपर्यंत दुसरा पाय उचलायचा नाही. मग मी त्याप्रमाणे उतरायला लागलो तसं पटकन जमलं. पाय घसरत असेल तर एखाद्या थोड्या मोठ्या दगडाचा आधार घेऊन पाय ठेवत होतो. जमलं व्यवस्थित. जिथे दोर संपला तिथून पुढे काय? समोर दरीच्या काठावर एक दणकट आणि धिप्पाड संयोजकांपैकी एक उभा होता. त्याच्यामागे दरीतून वर आलेली झाडं.  जिथे दोर संपला तिथून त्याच्या दिशेने पळत किंवा घसरत जायचं, की तो येणाऱ्या माणसांना बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या सहकाऱ्याकडे ढकलायचा. बापरे! दोघांचा नेम चुकला तर दरीत? मला जरा घामच फुटला. पण पर्याय तर अजिबात नव्हता. आधी संदीप पुढे गेला. मग अस्मिता धावत गेली. तिला अलगद त्या संयोजकाने बाजूला केलं. तसा मी पळत गेलो. त्यानं मला अलगद बाजूला ढकललं आणि दुसऱ्याने पकडून थांबवलं. भारी वाटलं. वाटलं परत वर जावं आणि पुन्हा पळत खाली यावं. बाकीचे कसे येतायत हे थोडं बघत उभा राहिलो. जे बसून येत होते त्यांना पकडणं जरा अवघड होतं. पण त्या संयोजकाचं कौशल्य चांगलं होतं. आणि सर्वांनी तो टप्पा व्यवस्थित पार पाडला. मजा आली.
थोडं पुढं गेल्यावर एका मोकळ्या जागेवर सावली बघून सगळे थांबले होते. तिथं आम्हाला जेवण देणार होते. जेवण म्हणजे पिठलं आणि भाकरी. आधीच त्याची व्यवस्था केलेली होती. आता मात्र सवय असल्यासारखं ते अळणी पिठलं भाकरी खाऊन घेतली. भूक लागलीच होती. दोन भाकरी आणि पिठलं. बरं वाटलं. थोडा वेळ तिथेच विश्रांती घेत बसलो. दुपारचे दोन तीन वाजले असतील कदाचित. आता मात्र पेंग येऊ लागली होती. कारण रात्री झोप झालीच नव्हती त्यात रात्री रायगडावर जाऊन आलेलो आणि पुन्हा सकाळपासून चालत होतो. त्यात आत्ताच जेवणही झालेलं. अर्धा पाऊण तास तिथेच थांबलो होतो. विशेष म्हणजे सगळे ग्रुप तिथेच होते. कुणी झाडाखाली जाऊन ताणून दिलेली तर काहीजण गप्पा मारत बसलेले. कुणी बूट काढून पाय चोळत बसले होते तर कुणी आजूबाजूच्या झाडांवर कसली निरीक्षणं करत होते.
सूचना मिळाली तसं पुन्हा पायपीट चालू झाली. आता चढण चढायचं होतं. सगळेच थकलेले होते त्यामुळे हळूहळू चालणं आणि थोड्या गप्पा सुरू होत्या. जंगलातून जात होतो आणि उन्ह फारसं जाणवतही नव्हतं. कुणीतरी सांगितलं की आपण जवळ आलोय. तसं अंगात थोडं बळ आलं आणि पाय झपझप उचलायला लागलो. जंगलातून बाहेर आलो तसं लांबवर शाळा दिसली तसं जवळपास सगळेच पळत सुटले. सूर्य पश्चिमेकडे झुकलेला. आम्ही आमच्या खोलीत गेलो. आणि सरळ आडवं पडून राहिलो. पाय ठणठण करत होते. कदाचित थोडी डुलकी घेतली असेलही.
मग हातपाय तोंड धुवून घेतलं. साधारण सहाच्या आसपास आम्हाला चहा आणि दोन बिस्किटे दिली. आता आम्हाला हवं ते खाण्याची मुभा होती म्हणून घरातून आणलेल्या पदार्थांवर ताव मारला. गाडी यायला तासभराचा अवकाश होता म्हणून सगळे आवरून बाहेर पटांगणात खेळत होते. कुणी बॅटबॉल आणलेलं तर कुणी फुटबॉल. कोल्हापूर ग्रुप मधील कुणीच काहीही आणलेलं नव्हतं. कारण ट्रेक संपल्यावर अशा गोष्टींसाठी वेळ मिळेल असं वाटलं नव्हतं. मग काय एकाचं डोकं चाललं की विटी दांडू खेळायचं. कसं? जवळच असलेल्या कंपाउंड जवळील पडलेल्या झाडाच्या वाळलेल्या फांद्या बघून त्यातून चांगला दांडू म्हणून एक फांदी निवडून घेतली आणि विटी साठी एका फांदीचा तुकडा घेऊन तो दगडाने तासून विटी तयार केली. मग काय आमचा जोरदार खेळ चालू झाला. कोल्हापूर ग्रुपमध्ये जोश आला. आणि आमचा अचानक चालू झालेला खेळ बघून बाकीच्या ग्रुपमधील मुलं आवाक होऊन बघत बसली. कारण त्यांचा खेळ थोड्या अंधारामुळे बंद झाला पण आम्ही आमची बस येईपर्यंत खेळ चालूच ठेवला. एक विटी हरवली की दुसरी तयार करत होतो.
एकेक गाडया येत होत्या आणि त्यांच्या ग्रुपला घेऊन जात होत्या. आमची गाडी जरा उशिराच आली. रात्रीच्या प्रवासात काहीच कळालं नाही. आम्ही पहाटे कधीतरी एसटी स्टँडवर पोचलो.
या ट्रेकनंतर मात्र पुढे भरपूर ट्रेक आणि भटकंती करायची सवय लागली. त्याबद्दल पुढे लिहीत राहीनच…

Comments